आशिष देशमुख यांचं भाजपला आव्हान !

आशिष देशमुख यांचं भाजपला आव्हान !

नागपूर – भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी लोकसभेसाठी जर संधी मिळाली तर नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच नागपूरची जागा गडकरींसाठी अनुकूल नसल्यामुळे याठिकाणी विजय आपलाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून भाजपाने ती जिंकून दाखवावी असे आव्हानही देशमुख यांनी भाजपाला दिले आहे.

दरम्यान आपण दिलेला राजीनामा अद्याप विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नाही. तसेच आपला राजीनामा तत्काळ मंजूर न केल्यामुळे देशमुख यांनी संशय व्यक्त केला आहे. ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम जाहीर होताना आपला राजीनामा मंजूर करुन काटोलमध्ये विधानसभा पोटनिवडणूक घ्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच गडकरी यांनी विदर्भाला धोका दिला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही भाजपा स्वतंत्र्य विदर्भाबाबत बोलत नाही. भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाने विदर्भाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हलबा समाजाला दिलेले अश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जनतेमध्ये रोष असल्याचंही देशमुख यांनी यावेळी म्हटलं आहे.

विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण तयार असून राष्ट्रीय विचारांबरोबर आपण काँग्रेसच्या जवळ आहोत. आपली राजकारणाची दिशा निश्चित आहे. त्यामुळे लवकरच आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS