आण्णांची तारीख ठरली

आण्णांची तारीख ठरली

अहमदनगर: कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे या प्रमुख मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. आपल्या आयुष्यातील हे शेवटचे आंदोलन असेल, असा निर्धारही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उपोषणाची तारीख जवळपास नक्की झाली आहे. ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. मात्र, नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आतापर्यंतच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता हजारे यांनी आपली आंदोलने विशेष दिवसांचे निमित्त साधून सुरू केलेली आहेत. त्यामुळे यावेळीही हजारे ३० जानेवारी या हुतात्मा दिनापासून आंदोलन करतील, अशी शक्यता आहे.

आंदोलनासाठी दिल्लीत रामलीला मैदान किंवा अन्यत्र जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांना उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हजारे यांनी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणेवरही टीका केली. आता त्यांनी तारीखही ठरविली आहे. लवकरच ही तारीख ते सरकारला कळविणार असून दिल्लीत जागा मिळाली नाही, तर राळेगणसिद्धी येथेच यादव बाबा मंदिरात त्यांचे उपोषण होणार आहे.

COMMENTS