मोठी किंमत चुकवावी लागणार; लाॅकडाऊनबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

मोठी किंमत चुकवावी लागणार; लाॅकडाऊनबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काळात कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. राज्यात मागील दोन आठवड्यांत २० हजार २११ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सध्या कुणीच मास्क वापरत नाही, असे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

राज्यात गेले काही दिवस नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ४ हजारावर नवीन बाधितांची भर पडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना रुग्णवाढ दिसून येत आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार विभागवार आढावा बैठका घेत आहेत. आज औरंगाबाद येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही मंत्र्यांनी राज्यातील करोना स्थितीवरही भाष्य केले व एकप्रकारे धोक्याचा इशाराच दिला. त्यावर बोट ठेवत अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी उद्या भेटणार आहे. या बैठकीत करोनासंदर्भात कदाचित कठोर निर्णय घेतले जातील, असेही अजित पवारांनी नमूद केले. करोनामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन आम्ही केले आहे, तरीही काही लोक यात नाहक राजकारण करत असल्याची टीका अजित पवार यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठीही नियमावली लागू केली पाहिजे. याबाबत नक्कीच मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही अजितदादा म्हणाले.

COMMENTS