शिवसेनेत गेलेला ‘हा’ नेता पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?, आधी शिवसेनेवर थेट नाराजी, आता अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य !

शिवसेनेत गेलेला ‘हा’ नेता पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?, आधी शिवसेनेवर थेट नाराजी, आता अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य !

रत्नागिरी – राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नेत्यानं आपल्या जुन्या सहकाय्राचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं आहे. आमदार भास्कर जाधव यांनी आज चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं थाटामाटात स्वागत केलं. एवढच नाही तर अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करण्याची संधी भास्कर जाधव यांनी सोडली नाही. जाधवांच्या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाहाप्रसंगी अजित पवार आज चिपळूणमध्ये गेले होते. यावेळी भास्कर जाधव आपल्या जुन्या सहकाऱ्यांना घेऊन चिपळूणमधील निवासस्थानी गेले. अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी जाधवांच्या घरी भोजनही केले.

काही दिवसांपूर्वीच जाधव यांची शिवसेनेवरील नाराजी दिसून आली होती. गणपतीपुळ्यातील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या सत्कारानंतर फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली होती. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. मात्र जाधवांनी प्रतिसाद दिला नव्हता. तसेच विनायक राऊत स्वत: भास्कर जाधव यांना बोलवण्यासाठी शेजारी गेले. त्यांनी जाधवांना सगळ्यांसोबत येण्याची विनंती देखील केली. मात्र तेव्हाही त्यांनी हात झटकत नकार दर्शवला होता. त्यानंतर आता जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आपल्या घरी जोरदार स्वागत केलं आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS