शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, अन्यथा अर्थसंकल्प मांडू देणार नाही – शिवसेना

शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, अन्यथा अर्थसंकल्प मांडू देणार नाही – शिवसेना

मुंबई – शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन शिवसेना पुन्हा आक्रमक झालीय. शेतक-यांची कर्जमाफी द्या, अन्यथा यंदाचा अर्थसंकल्प मांडू देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय. मातोश्रीवर मंगळवारी  संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा इशारा देण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून विधीमंडळाचं अधिवेशन कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे होऊ शकलेलं नाही. कर्जमाफीच्या मुद्दावरुन शिवसेनाही आक्रमक होत विरोधकांना जाऊन मिळाली आहे. मंगळवारी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाची कामकाज अनेकवेळा तहकूब करण्यात आलं होतं. त्यावेळी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीला शिवसेनेच्या काही सदस्यांनी हजेरी लावली. मंगळवारी कामकाज तहकूब झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे कर्जमुक्तीची मागणी करावी अशी मागणी केली. यावरुन शिवसेना कर्जमाफीच्या मुद्दावरुन आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.

COMMENTS