शरद पवार विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ?

शरद पवार विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ?

राष्ट्रपतीपदाची निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसंतसं सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या हालचाली वाढत आहेत. बाबरी  मशीद प्रकरणी खटला चालवण्यास परवानी मिळाल्यामुळे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे मागे पडली आहेत. त्यामुळे भाजपकडून आता संघपरीवारातील कोणतरी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांसह विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. डाव्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यासाठी आग्रह धरल्याचं समजतंय. पवार यांच्या आधी जेडीयूचे नेते शरद यादव याचं नाव घेतलं जात होतं. मात्र त्यांचं नाव मागे पडलं असून पवारांच्या नावावर विरोधकांमध्ये एकमत होण्याची चिन्हे आहेत. पवार उमेदवार ठरल्यास ते एनडीएची मते खेचून आणू शकतात तसंच शिवसेनाही पवारांना मदत करु शकते असा डाव्या पक्षाच्या नेत्यांचा व्होरा आहे. काही दिवसांपूर्वी सिताराम येचुरी आणि प्रकाश करात यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ही योजना त्यांच्यासमोर मांडल्याचं बोललं जातंय.

शरद पवार यांनी मात्र या प्रस्तावावर काही प्रतिक्रिया दिली नसल्याचं बोललं जातंय. मात्र त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात एकमत घडवूण आणण्याचा प्रय़त्न सुरू केल्याचं बोललं जातंय. पवार यांनी  मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला याचं नाव राष्ट्रपती पदासाठी पुढं केल्याचं बोललं जातंय. अनेक वर्ष राज्यसभेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या हेपतुल्ला या मोदी मंत्रिमंडळात काही काळ मंत्री होत्या. तसंच त्या शरद पवार यांच्या जवळच्या मानल्या जातात. विरोधकांनाही त्या मान्य होतील आणि भाजपही त्यांना नाकारु शकणार नाही अशी पवारांची अटकळ असल्याचं बोललं जातंय.

COMMENTS