महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे बेरोजगारीविरोधात आंदोलन !

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे बेरोजगारीविरोधात आंदोलन !

मुंबई – युवकांना रोजगार पुरवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी  केंद्रातील मोदी सरकारने NRC आणि CAA चा कायदा आणला आहे. परंतु देशाला NRC ची गरज नसून NRU ची तत्काळ गरज आहे असे स्पष्ट करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राष्ट्रीय बेरोजगार नोंदणी (NRU) ची मागणी केली आहे.
सरकार जरी सगळे ठीक असल्याचे सांगत असले तरी बेरोजगारीचे सध्याचे प्रमाण गेल्या 45 वर्षांतील सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO’s) दिला गेला आहे विशेषतः नोटबंदीनंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. एनडिटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार लघु मध्यम उद्योगातील नोटबंदीमुळे 50 लाख रोजगार नष्ट झाले आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45 %  हिस्सा असलेल्या असंघटित क्षेत्रात नोटबंदीमुळे करोडो रोजगार नष्ट झाले आहेत.

भारतीय जवानांच्या नावावर भावनिक राजकारण करणारे मोदी सरकार 27000 जवानांना सेवेतून कमी करण्याच्या तयारीत आहे. भाजप खाजगीकरणाचा पुढाकार घेत सरकारी नोकऱ्यांची कपात करत आहे. भारतीय रेल्वे बोर्ड 3 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

यूपीएससीने 2014 साली 1364 जागांची जाहिरात काढली होती तोच आकडा खाली येउन 2018 मध्ये फक्त 759 जागा भरावयास काढल्या आहेत. रेल्वे किंवा एसएससी (SSC) च्या जाहिराती येतात पण परीक्षा घेतल्या जात नाहीत.संसदेतील शारदाबेन पटेल, हरनाथसिंह यादव, राजा ए. नाईक या भाजपच्याच खासदारांनी केंद्र सरकारमधील रिक्त पदांसंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावर सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार केंद्र सरकारमध्ये एकूण 38.02 लाख पदे मंजूर असून त्यातील जवळपास 6.83 लाख पदे रिक्त आहेत. म्हणजेच ही पदे भरण्यास मोदी सरकारची अनास्था असल्याचे स्पष्ट आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा मंदी आहे.वाहन क्षेत्रात गेल्या 4 महिन्यात 3.5 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. रोजगारनिर्मितीचे हे अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारने NRC आणि CAA चा कायदा आणला आहे. परंतु देशाला NRC ची गरज नसून NRU ची तत्काळ गरज आहे. युवक काँग्रेस बेरोजगारी विरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकारने NRC ऐवजी युवकांसाठी तात्काळ राष्ट्रीय बेरोजगार नोंदणी (NRU) सुरू करावी अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली. युवकांमधून एनआरयु ला समर्थन मिळवण्यासाठी युवक काँग्रेसने 8151994411 हा टोल फ्री नंबर खुला केला असून बेरोजगार युवक टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन एनआरयूच्या मागणीला पाठिंबा देऊ शकतील असे तांबे यांनी सांगितले.

COMMENTS